मुंबई, दि. ५ : मानसिक आरोग्य संस्थेच्या पाषाण येथील जागेवर २५० खाटांचे अद्ययावत मानसिक आरोग्य संकुल उभे करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

मानसिक आरोग्य संस्थेची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, सहायक प्राध्यापक श्रीकांत पवार, डॉ. नितीन अभिवंत, अभिजित जिंधाम आदी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, सध्याची राज्यातील कोविड-१९ परिस्थिती पाहता आपल्या प्रत्येकासाठी मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक झाले आहे. अद्ययावत मानसिक आरोग्य संकुल उभारणे ही काळाची गरज असल्याने याबाबतचा प्रस्ताव तयार करुन सादर करण्यात यावा. याशिवाय या संकुलामध्ये संस्थेमार्फत मानसिक आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रम कसे सुरु करता येतील, याबाबतही अभ्यास करण्यात यावा. सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेअंतर्गत पाठ्यक्रमासाठी १६ अध्यापकीय पदे निर्मिती करणे आवश्यक असल्याने पदभरतीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास सादर करण्यात यावा, अशा सूचनाही देशमुख यांनी दिल्या.

सध्या ससून सर्वोपचार रुग्णालयात दररोज बाह्यरुग्ण विभागात सरासरी १७०  ते २०० रुग्णांची तपासणी होत असून सन २०१९ मध्ये ७२७ आंतररुग्ण व ४६,२१३  बाह्यरुग्ण असे एकूण ४६,९४० रुग्णांना सेवा देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेची ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून सन २०११ मध्ये निवड करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था ससून सर्वोपचार रुग्णालय परिसरात मनोविकृतीशास्त्र विभागाबरोबर संयुक्तरित्या कार्यरत आहे. या संस्थेमार्फत मनोरुग्णांना बाह्यरुग्ण सेवा व आंतररुग्ण सेवा दिल्या जातात.

Comments are closed

error: Content is protected !!