मुंबई दि. ६ (punetoday9news):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता यावे या उद्देशाने राज्याच्या क्रीडा विभागाने एक्स्ट्रालिव्हिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक फिटनेस चँपियनशिपच्या निकालाची घोषणा क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केली.

कोविड-१९ या साथीच्या रोगाची तीव्रता सर्व देशांसाठी सारखीच आहे. या काळात घरामध्ये राहणे व सर्व कामकाज ऑनलाईन करणे हा दिनक्रम असतांना घरात किंवा घराच्या आजूबाजूला व्यायाम करणे हाच एक स्वत:ला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्याचा मार्ग आहे. त्यात एक सकारात्मक प्रयत्न म्हणून क्रीडा विभागाने खेळाडूंना ऑनलाईन सूचनेद्वारे या स्पर्धेचे आयोजन केले. त्यात देशातील काश्मीर, केरळ, गुजरात ते मिझोरामपर्यंत सर्व वयोगटातून स्पर्धकांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी केलेल्या कामगिरीचे ऑनलाईन मूल्यांकन करुन निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये पुरुष गटातून प्रथम क्रमांक शिव यादव, द्वितीय क्रमांक साजन अग्रवाल, तृतीय क्रमांक परवेश तमंग व महिला गटात  प्रथम क्रमांक श्रद्धा तळेकर, द्वितीय क्रमांक मनस्वी जमजारे, तृतीय क्रमांक ऋजुला अमोल रोहिणी भोसले यांनी मिळविला. या दोन्ही गटांना एक्स्ट्रालिव्हिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने आकर्षक व रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्याप्रमाणे हर्षवर्धन काडरकर, अधृत भार्गव, अर्णव शहा, आर्या चौधरी, मोक्ष अग्रवाल, चार्वी लापसिया, राघव निम्हण, राशी नारखेडे, असीम कुंटे, कैरवी पांडे, सार्थक दहिवाळे, आरोही पाटील, विशाल गवळी व आश्लेषा जगताप हे अनुक्रमे ४ ते १७ या वयोगटातून विजेते झाले.

खेळाडूंमध्ये सकारात्मक दृष्टीकोन कायम ठेवण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविणाऱ्या सर्व क्रीडा अधिकारी,  एक्स्ट्रालिव्हिंग प्रायव्हेट लिमिटेड व सहभागी झालेल्या सर्व स्पर्धक विजेत्यांचे राज्यमंत्री तटकरे यांनी यावेळी आभार मानले. विजेत्यांचे अभिनंदन करताना पुढील काळात सर्व खेळाडूंना प्रत्यक्ष उपस्थितीत आपले कसब दाखवता येतील अशा स्पर्धा विभागामार्फत आयोजित केल्या जातील, असे तटकरे यांनी सांगितले.

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, एक्स्ट्रालिव्हिंग प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी व स्पर्धक उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!