मुंबई, दि. ७ ( punetoday9news):-राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार रोहित पवार, संजय शिंदे, अतुल बेनके यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव राहुल कुलकर्णी, श्रीमती गीता कुलकर्णी, सु. मो. महाडिक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सु. ह. अवताडे उपस्थित होते.
भरणे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट अ आणि ब संवर्गासाठी, पोलीस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आदी काही गट क मधील पदांसाठी तसेच बृहन्मुंबईतील लिपिक संवर्गासाठीही एमपीएससीमार्फत भरतीप्रक्रिया राबविण्यात येते. तथापि, राज्यातील उर्वरित जिल्ह्यात बहुतांश गट ब अराजपत्रित आणि गट क मधील पदांची भरतीप्रक्रिया स्थानिक पातळीवर होते. त्यामुळे उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागल्याने खर्च वाढतो.
एमपीएससीच्या माध्यमातून केंद्रीकृत पद्धतीने एकाच वेळी या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवावी अशी मागणी उमेदवारांकडून येत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सर्वच गट ब आणि गट क संवर्गातील पदांची भरती एमपीएससीच्या माध्यमातून राबविता येईल काय याबाबत चाचपणी करण्यात येईल. तथापि, प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला लिपिक संवर्गासाठी एमपीएससीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांना वेगवेगळ्या विभागांच्या परीक्षेसाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही तसेच त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक तसेच शारीरिक त्रास वाचू शकेल.
Comments are closed