भ्रमंती विशेष ब्लाॅग :- निळकंठेश्वर (पुणे,डोणजे)
सह्याद्रीच्या या पसरलेल्या विस्तृत पर्वत रांगा म्हणजे गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांसाठी एक न संपणारी पर्वणीच म्हणावी लागेल.
मागील काही महिने कोरोना प्रादुर्भावाने सर्वच गिर्यारोहकांना आपली आवड बंद ठेवून निसर्गापासून दूर रहावे लागले. आताही सर्व ठिकाणी शासनाने परवानगी दिली नसली तरी वैयक्तिक व्यायामास परवानगी आहे त्यामुळे व्यायामाचा एक भाग म्हणून सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून ही भ्रमंती केली आहे.
नीलकंठेश्वर नाव पुण्यात धार्मिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे मात्र त्याप्रमाणेच सुंदर गिर्यारोहणासाठी म्हणावे लागेल.
कसे जाल:-
येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक पुण्यातून पानशेत धरणाचा डोणजे मार्ग तर दुसरा पिरंगुट मार्गे मुठा गावातून.
आम्ही दुसरा मार्ग स्वीकारला. एकतर गर्दी टाळायची होती तसेच पिरंगुट मार्गे अधिकचा निसर्गाच्या सान्निध्यातून प्रवास होणार म्हणून.
समुद्रसपाटीपासून निळकंठेश्वर साधारण तीन-साडेतीन हजार फूट उंचीवर हा डोंगर आहे. हा चढ अत्यंत सोपा असेल असे प्रथमदर्शनी वाटते . परंतु प्रत्यक्षात चढण लहान असली तरी मोठ्या प्रमाणात गवत वाढले असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
सपाट पायरी मार्गावरून न जाताना डावीकडून डोंगरमार्ग निवडला होता पावसानंतर बदललेली व नवलाईने नटलेली निसर्गाची सुंदरता मनाला भुरळ घालणारी आहे. डोंगरावर सर्वत्र हिरवा शालु परिधान केल्याप्रमाणे हिरवळ बघायला मिळते . त्यात मध्येच विविध रंगांची रानफूले कॅमेऱ्यात स्वतःला टिपाव अशा नजरेने मन आकर्षित करतात. लाल, पिवळा, गुलाबी अशी रंगांची उधळण पहायला मिळते.
त्यात लांब कोठून तरी मोराचा आवाज ऐकायला मिळतो तर कधी वानरांच्या आवाजात प्रखरता जाणवते तर छोट्याशा कीटकांची किरर्र संगीतमय सभा चालू ठेवते. मनाला अलौकिक शांततेकडे घेवून जाणारा हा प्रवास. आम्ही पायरीमार्ग सोडून गवतातून जाणाऱ्या पायवाटेने चालत निघालो होतो. गवत खूपच वाढलेले असल्याने काही ठिकाणी अगदी डोक्याच्या वर पोहचले होते. त्यातून मार्ग काढत आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो. पहिला टप्पा पुर्ण होताच मोठे दगड लक्ष वेधून घेत होते कारण गवत वाढलेले असतानाही त्यापेक्षा सात-आठ फुट हे दगड गवतापेक्षा ऊंच होते. त्यावरून पाहिल्यावर दुरपर्यतचा नजारा नजरेत कैद करता येऊ शकतो. काही वेळ मस्त पैकी या दगडावर बसून डोळ्यांनी व कॅमेराने नजरेत मावेल एवढे दृश्य सामावून घेतले.
पुढे थोडे शंभर-दीडशे मीटर चालल्यानंतर डावीकडे पूर्वेकडून थंड हवेचा झोत स्पर्शून जातो तर दुरपर्यत नजर टाकल्यावर पानशेत धरणाचा जलाशयाची निळाई डोळ्यांना शांतता प्रदान करते. डोंगर कड्यावरून पायथ्याशी मध्येच क्रिकेट चे मैदान बनेल असा छोट्याशा पठारावर सपाट पृष्ठभाग दिसतो. याच कड्यावरून चालत मंदिराच्या दिशेने पुढे चालल्यावर मुर्त्याची कमान स्वागत करताना झाडीतून डोकावते. हा थोड्याच अंतराचा मार्ग असला तरी मन तृप्त करून टाकणारा अनुभव देतो.
निळकंठेश्वर मंदिर परिसरात मुख्य आकर्षण आहे ते इथल्या पुतळ्यांचे देखावे! दोन रेखीव हत्तींच्या पुतळ्याच्या स्वागत कमानीतून आपण आत शिरताच एकापाठोपाठ एक असे असंख्य सुंदर पुतळे आपणांस दिसु लागतात. निळकंठेश्वराच्या मुख्य मंदिरापर्यंतची वाट आणि संपूर्ण परिसर या आणि अशा सुंदर पुतळयांनी भरला आहे. दशावतार, इंद्राचा दरबार, सत्यवान-सावित्री, अमृत मंथन, कृष्ण्लीला, बकासुर वध, अष्टविनायक, नवनाथ जन्मकथा, शिवाजी महाराज, विविध जाती धर्मातले देव देवता, ऋषी-मुनी आणि रामायण-महाभारतातल्या प्रसंगांनी संपुर्ण परिसर सजीव झाल्यासारखे वाटते. १५-२० एकराच्या या परिसरांत एक हजाराच्या आसपास पुतळे असावेत. सध्या कोरोना प्रादुर्भावाने मंदिर बंद आहे त्यामुळे बाहेरूनच नमस्कार करून आम्ही पुतळे पाहण्यास गेलो.
पुण्यात अशी अनेक ठिकाणे असली तरी त्यातही निळकंठेश्वर हे ठिकाण कमी कालावधीत गिर्यारोहणाचा अलौकिक आनंद देणारे नक्कीच मानावे लागेल.
– सागर झगडे.
Comments are closed