पिंपरी,दि. ८ (punetoday9news) :- पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत चाकण परिसरातील शेलपिंपळगाव येथे २० कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्स (एम.डी) पाच व्यक्तींकडून जप्त केले आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. ते कोणाला अंमली पदार्थ विकण्यासाठी आले होते हे स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी पोलीस कर्मचारी शाकिर जीनेडी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी चेतन फक्कड दंडवते वय- २८, आनंदगीर मधूगिर गोसावी वय- २५, अक्षय शिवाजी काळे वय- २५, संजीवकुमार बन्सी राऊत वय-४४ रा. झारखंड, तौसिफ हसन मोहम्मद तस्लिम वय- ३१ रा.बिहार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरातील शेलपिंपळगाव येथे काही व्यक्ती मेफेड्रोन ड्रग्स (एम.डी) हे बाळगून असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कर्मचारी यांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून आरोपींना मोटारीसह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे २० कोटी रुपयांचे ड्रग्स, ५ लाखांची मोटार तसेच २३ हजार रुपये रोख रक्कम अशी एकूण २० कोटी ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या पैकी दोन आरोपी हे बिहार आणि झारखंड येथील आहेत त्यामुळे ड्रग्स कोणाला विक्री करण्यासाठी आणले होते का? याचा तपास अमली पदार्थ विरोधी पथक करत आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed