पिंपरी ,दि. १२ (punetoday9news) : –   पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर परिसरात दरोडा, जबरी चोरी, खून असे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ११ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात १०० किलो चांदीचे दागिने, पाऊण किलो सोन्याचे दागिने, तीन कार, एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. शहर आणि परिसरातील एकूण ३४ गुन्हे उघड झाले आहेत.

विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय- ३१ रा. हडपसर) आणि विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (वय १९ रा. कल्याण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून, यातील मुख्य आरोपी विकीसिंग याच्यावर गंभीर आणि इतर असे एकूण ५६ गुन्हे दाखल असून ४१ गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झालेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात काही दिवसांपासून सोने-चांदीची दुकाने  लुटण्यावर या  चोरट्यांचा भर होता. शहरातील अनेक दुकाने अज्ञातांनी फोडून दागिने लंपास केल्याच्या घटना झाल्या होत्या. त्या अनुषंगाने वाकड पोलिसांनी तपास केला असता या  सराईत आरोपींना हडपसर परिसरातून अटक केली गेली. मुख्य आरोपी विकीसिंग हा लष्करात नोकरी करत असल्याचे सांगून भाड्याच्या खोलीत राहात असे. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. काही वेळेस त्याने पोलिसांवर गोळीबार देखील केल्याची माहिती मिळाली आहे .

त्याचबरोबर  त्याचे वडील देखील गुन्हेगार आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विकीसिंग हा त्याचा मेहुणा विजयसिंगच्या साथीने सोने-चांदीच्या दुकानावर डल्ला मारून चोरी केलेले दागिने घरात ठेवत होता. त्याच्या घरातून एकूण १०० किलो चांदीचे दागिने आणि पाऊण किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सदर ची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि सिद्धनाथ बाबर यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!