पुणे, दि . १२ (punetoday9news ): –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाकडून (पीएमआरडीए) सुरु असलेल्या नऱ्हेमधील अभिनव कॉलेज परिसरातील रस्त्याच्या खोदकामामध्ये गेल्या आठ दिवसांत महावितरणच्या उच्च व लघुदाबाच्या १५ ठिकाणी वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. परिणामी या परिसरातील सुमारे ६०० ते ७०० वीजग्राहकांचा दररोज वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यातच महावितरणची वीजयंत्रणा स्थलांतरीत न करता रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासह रुंदीकरणाचे काम सुरु आहे.

 

याबाबत माहिती अशी, की महावितरणच्या पर्वती विभाग अंतर्गत नऱ्हे येथील अभिनव कॉलेज परिसरात पीएमआरडीएकडून रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी खोदकाम सुरु आहे. यामध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये दररोज दोन ते तीन प्रमाणे आतापर्यंत एकूण 15 ठिकाणी महावितरणच्या भूमिगत उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. या परिसरात सुमारे ५०० ते ६०० निवासी सोसायट्या आहेत. परंतु खोदकामात वीजवाहिन्या तोडल्या जात असल्याने दररोज ३ ते ४ सोसायट्यांचा वीजपुरवठा खंडित होत आहे आणि त्याचा सुमारे ६०० ते ७०० वीजग्राहकांना फटका बसत आहे. भूमिगत वाहिन्या तोडल्यानंतर पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ न शकल्यास महावितरणला वीजविक्रीमध्ये नुकसान तसेच वाहिनी दुरुस्तीचा खर्च सहन करावा लागत आहे. तसेच ग्राहकांना देखील खंडित वीजपुरवठ्याचा नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. यासोबतच वीजग्राहकांचा महवितरणला रोष सहन करावा लागत आहे.

वस्तुतः रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण व रुंदीकरणाच्या कामात मध्यभागी येणारे वीजखांब, वाहिन्या, रोहित्र आदी वीजयंत्रणा स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमाप्रमाणे पीएमआरडीएकडून महावितरणकडे प्रस्ताव पाठविणे आणि महावितरणकडून देण्यात आलेल्या इस्टिमेटप्रमाणे कंत्राटदार नेमून वीजयंत्रणा स्थलांतरीत करण्याची जबाबदारी पीएमआरडीएची आहे. मात्र सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता किंवा वीजयंत्रणा स्थलांतरीत न करता रस्त्याचे कामे सुरु आहेत. त्यातच दररोज भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या जात असल्याने वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महावितरणकडून पीएमआरडीएला कळविण्यात आले आहे. खोदकामाची रितसर परवानगी घेतल्यानंतर संबंधीत कार्यालयास कळविल्यास वीजवाहिन्यांना खोदकामातून धोका होणार नाही याची काळजी महावितरणकडून घेण्यात येऊ शकते. मात्र कोणत्याही प्रकारची पूर्वमाहिती न देता खोदकाम होत असल्याची स्थिती अद्याप कायम आहे.

जाहिरात :-


#

Comments are closed

error: Content is protected !!