मुंबई, दि. १५ ( punetoday9news):- मिशन बिगिन अगेन संदर्भात राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
राज्यातील सर्व शासकीय व खासगी ग्रंथालये कोविड-१९ मार्गदर्शक सूचनांचे पालन करून १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मेट्रो रेल्वे देखील निर्देशित कार्यपद्धतीनुसार सुरू करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत.
सर्व शासकीय व खासगी ग्रंथालये कोविड-१९ संबंधी दिलेली मार्गदर्शक तत्वे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील. मेट्रो रेल्वे सुद्धा १५ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भात नगरविकास विभागामार्फतची मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील.
विवाह व इतर कौटुंबिक कार्यक्रमात पाहुण्यांची संख्या ५० पेक्षा जास्त ठेवता येणार नाही. तर अंतिम संस्कारांसाठी ही संख्या पूर्वी जारी केल्याप्रमाणे २० असेल. त्याचप्रमाणे उद्यान, पार्क आणि सार्वजनिक ठिकाणे पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. १५ ऑक्टोबरपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेर असलेले बिजनेस-टू-बिजनेस (B2B) प्रदर्शनासाठीही परवानगी देण्यात आलेली आहे. उद्योग विभागाची मार्गदर्शक तत्त्वे यासाठी लागू असतील.
कंटेनमेंट झोनच्या बाहेर जनावरांच्या बाजारासहित स्थानिक आठवडी बाजारांनाही परवानगी देण्यात आली आहे. यासाठी शहरी / ग्रामीण स्थानिक प्रशासनाची मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील.
बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार व दुकानांना दोन तास जास्त सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर १५ ऑक्टोबरपासून बाजारपेठ व दुकाने अतिरिक्त दोन तास म्हणजे सकाळी नऊ वाजेपासून रात्री नऊ पर्यंत सुरू राहू शकतील.
विविध विमानतळावर येणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांची कोरोना लक्षणांबाबतची तपासणी केली जाईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रेल्वे स्टेशनवर आरोग्य चाचणी करून स्टॅम्पिंग केले जाईल. त्यांनाही कोविड-१९ संबंधी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन करावे लागेल.
Advt:-
.
Comments are closed