पिंपरी,दि.१६(punetoady9news ) :- जागतिक अंध दिवसानिमित समाजातील वंचीत घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी “चलो किसिका सहारा बने” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात करण्यात आले.अंध बांधवांच्या व्यथा,वेदना व गरज याचा विचार करून त्यांना सहानभूती नको सहकार्य करणे महत्वाचे असल्याचे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले. त्यासाठी त्यांनी स्वतः डोळ्यावर काळी पट्टी बांधून अंध विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. पोलीस आयुक्तालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. पांढऱ्या काठीचे वाटप आयुक्तांच्या हस्ते अंध विद्यार्थ्यांना करण्यात आले.
आधुनिक युगात तंत्र ज्ञानाचा वापर करुन या व्यक्ती आपले अस्तित्व कशा प्रकारे दाखवीत आहेत या बाबत ऑन लाईन पद्धतीने प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अंध शिक्षक व प्रशिक्षक सतीश नवले यांनी ऑन लाईन माध्यमातून आयुक्तांशी संपर्क साधत अंध व्यक्तींच्या शिक्षण,रोजगार व इतर कार्यक्रमाची माहिती दिली. समाजच्या मुख्य प्रवाहात अंध बांधवांना सामावुन घेण्यासाठी समाजातील जागृत अशा डोळस व्यक्तींनी पुढे यायला हवे अशा भावना व्यक्त केली .या प्रसंगी प्रेरणा परिवाराचे अध्यक्ष पराग कुंकुलोळ जितो अध्यक्ष संतोष धोका यांच्यासह संस्थेचे सहकारी व अंध विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी आपल्या अनोख्या शैलीत अंध बंधवांना शुभेच्छा दिल्या.आयुष्यात आलेल्या अंधाराला न डगमगता आपण पुढे जायला हवं.मोठी स्वप्ने पाहून यशस्वी व्हायला हवे . दृष्टी नसली तरीही आपल्या कडे मोठे ध्येय गाठण्याची शक्ती आहे.आपल्या अंतर मनाला जागृत करून विविध क्षेत्रातील संधीचं सोनं करून घ्यावं. अडचणींवर मात करून आपण शिक्षण,खेळ,नोकरीच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल करीत आहात ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी संगितले.
आयुक्तांनी डोळ्यावर बांधली काळी पट्टी
आज जागतिक अंध दिवस असल्याने अंध बांधवांच्या व्यथा,वेदना व गरजा लक्षात याव्यात व समाजला त्यांच्या विषयीची माहिती व्हावी हा संदेश देण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः डोळ्यावर काळी पट्टी बांधून व्यासपीठावर आगमन केले.यावेळी उपस्थित सर्व अंध विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमासाठी अंध विद्यार्थी संतोष राऊत,तुप्ती कर्णावट, पूनम बंब,सुस्मिता कन्हेरी,नेमीचंद ठोले, विश्वास काशीद,अर्चना चोरडिया,सचिन साकोरे, उमेश भंडारी,मनीष ओस्तवाल यांच्या सह संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी योगदान दिले.
Advt :-
Comments are closed