आळंदी, दि २३(punetoday9news):- महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व उत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना आहेत . त्यामुळे गणेश उत्सवापासूनच कोणत्याही कार्यक्रमांना मोठ्या स्वरूपात साजरे करण्यास मनाई आहे . असे असतानाही आळंदी मध्ये जलाराम पार्क हाऊसिंग सोसायटी मध्ये नवरात्रीच्या उत्सवानिमित्त दांडियाचा कार्यक्रम घेण्यात आला . त्यामुळे पोलिसांनी दाखल घेत कार्यक्रम घेणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात कोणत्याही प्रकारचे सण-उत्सव एकत्रित येऊन, गर्दी करून साजरे न करण्याचे शासनाकडून वारंवार सांगण्यात येत असतानाही या सोसायटीत हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
जलाराम पार्क हाऊसिंग सोसायटीचे प्रभारी सचिव प्रफुल्ल दत्तात्रय माळवदे, अध्यक्ष प्रताप विजू शेवाळकर, उपाध्यक्ष महादेव पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी मच्छिंद्र नागनाथ शेंडे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या निर्णयानुसार नवरात्र उत्सवात गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी शहर परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करून नवरात्रीच्या उत्सवानिमित्त जलाराम पार्क हाऊसिंग सोसायटीच्या आवारात १५ ते २० महिला-पुरुषांना एकत्र जमवून दांडिया कार्यक्रम भरवण्याचा गैरप्रकार समोर आला . याबाबत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम १८८, २६९, २७०, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Comments are closed