• राज्याचा हक्काचा ३८ हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राकडे प्रलंबित.
  • संकटकाळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभे- मुख्यमंत्र्यांची ग्वाही
  • दिवाळीपूर्वी मदत पोहोचविण्याचे प्रशासनाला निर्देश

 

मुंबई, दि. २३(punetoday9news):-  राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुनर्उभारणीसाठी १० हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

 

शेती आणि फळपिकासाठी  केंद्राच्या निकषापेक्षा अधिक मदत.

या बैठकीनंतर माध्यमप्रतिनिधींशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, नुकसानग्रस्त शेती आणि फळपिकासाठी राज्य  शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा पुढे जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना  जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये याप्रमाणे २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल.

फळपिकासाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत

फळपिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल.  मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी आणि घर पडझडीसाठीही निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पायाभूत सुविधांच्या पुनर्उभारणीसाठी विभागांना निधी

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतपिकांप्रमाणेच पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाला या सुविधांच्या पुनर्उभारणीसाठी निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे ते म्हणाले. या १० हजार कोटी रुपयांमध्ये कृषी क्षेत्रासाठी ५५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यानंतर रस्ते आणि पुल यासाठी २६६५ कोटी, नगरविकास विभागासाठी ३०० कोटी, महावितरण आणि उर्जा विभागासाठी २३९ कोटी, जलसंपदा विभागास १०२ कोटी, ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा विभागास १ हजार कोटी, रुपयांचा‍ निधी देण्यात येईल. अतिवृष्टीने रस्ते, पुल, वीजेच्या पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा योजना, घरे, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत इमारती आणि शेतजमिनीचे जे नुकसान झाले त्याची कामे या निधीतून केली जातील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.





दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवा

सण समारंभापूर्वी ही मदत शेतकरी आणि नुकसानग्रस्त बांधवांच्या हातात पोहोचेल असा शब्द दिला होता. तो  पाळणार असून दिवाळीच्या आधी सर्व नुकसानग्रस्तांना ही मदत पोहोचवावी असे निर्देश आपण प्रशासनाला दिले आहेत.

प्रधानमंत्री यांनी आपल्याशी दूरध्वनीहून चर्चा करून आपद्ग्रस्तांना केंद्र शासनाकडूनही मदत केली जाईल असे सांगितले. आपल्यालाही यात कोणतेही राजकारण आणायचे नाही हे स्पष्‍ट करून मुख्यमंत्री म्हणाले की कठीण परिस्थितीतही राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिक यांच्यापाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने त्यांचे पाहणी पथक पाठवून झालेल्या नुकसानीचा आढावा घ्यावा यासाठी आधीच तीन पत्रे पाठविण्यात आली आहेत. ही पथके पाठवून लवकरात लवकर आढावा घ्यावा व राज्यातील नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना केंद्राने मदत करावी अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.

 

Comments are closed

error: Content is protected !!