रात्री १ वाजेपर्यंत चालली बैठक .
मुंबई, दि.२८(punetoday9news) :- महाराष्ट्रातील राजकारणात रोज नवीन वळणे पाहायला मिळत आहेत . महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा आहे, शिवसैनिकांनो सज्ज व्हा, अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आवाहन केले आहे. काल रात्री १० वाजता सुरु झालेली बैठक १ वाजेपर्यंत चालली असल्याने उद्धव ठाकरेंनी सर्व स्तरावर अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली असल्याचे दिसते. या बैठकीत शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यात येईल, निधी उपलब्ध करण्यात थोड्या अडचणी आहेत पण त्यावरही आपण मात करू असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्या जिल्ह्यात विकास कामांवर भर द्यावा, अशा सूचना देखील त्यांनी केल्या असल्याची माहिती आहे.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला होता. त्यातही त्यांनी म्हटले होते की, राज्यातली महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवावे असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले आहे . तसेच आम्ही गुळाला चिकटलेले मुंगळे नसून महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही, हे वाघांचं राज्य आहे. जो महाराष्ट्रच्या हिताच्या आडवा येईल त्याला आडवा पाडून गुढी उभी करणार असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला होता.
Comments are closed