पिंपरी,दि ३ (punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील साडेआठ लाख नागरिकांमध्ये अँटी बॉडीज आढळल्या असून त्यांना करोना होऊन गेल्याचे एका सर्वेतुन हि माहिती समोर आली आहे. डॉ. डी.वाय पाटील अँड रिसर्च आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिका यांच्या विद्यमाने सर्वे करण्यात आला आहे. शहरातील वेगवेगळ्या दोनशे परिसरातून २५ जणांच्या समूहाचे एकूण पाच हजार रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यानंतर हा सर्वे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण लोकसंख्येच्या ३३.९ टक्के नागरिकांना करोना होऊन गेल्याचं स्पष्ट झाले आहे. सध्या ८८ हजार करोना बाधितांची संख्या आहे. तर ८४ हजारांपेक्षा अधिक जणांनी करोनावर मात केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात डॉ. डी.वाय पाटील आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या विद्यमाने ७ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर दरम्यानच्या सर्वेमध्ये शहरातील विविध भागांतील दोनशे ठिकाहून २५ जणांच्या समूहाचे एकूण पाच हजार रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. दहा टीम च्या मार्फत तांत्रिक सर्वे पूर्ण करण्यात आला. यात झोपडपट्टीसदृश्य, बैठी घरे आणि सोसायटीचा सहभाग होता. त्यात शहरातील एकूण लोकसंख्येच्या ३३.९ टक्के नागरिकांमध्ये अँटी बॉडीज आढळल्या आहेत. त्यात पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त असल्याचं आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी सांगितले आहे.
वयानुसार ५१ ते ६५ वर्षाच्या नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले असून त्याचा दर ३५.५ टक्के इतका आहे. किशोरवयीन १२ ते १८ वर्षांच्या मुला-मुलींमध्ये २४.९ टक्के इतका आहे. ११ ते ३० वयोगटामध्ये २९.७ टक्के, ३१ ते ५९ वयोगटामध्ये ३१.२ टक्के आणि ६६ वयोगटावरील नागरिकांमध्ये २८.२ टक्के इतका आहे. कोविड-१९ मुळे असणारा सर्वसामान्य मृत्यू दर ०.१८% इतका आहे.
Comments are closed