पिंपरी,दि.५(punetoday9news):- आगामी पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. छावा मराठा संघटनेनेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पदवीधर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी संघटना गंभीर असून, मराठा आरक्षणासाठी छावा मराठा संघटनेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. या माध्यमातून हजारो विद्यार्थी संघटनेच्या पाठीमागे उभे राहिले आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी संघटनेने पुणे पदवीधर मतदार संघात उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे, अशी माहिती छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी दिली. 




रामभाऊ जाधव म्हणाले, की आपण स्वतः निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे निश्चित झाले आहे. संघटनेच्या वरिष्ठांशी चर्चा करून निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
         गेल्या काही महिन्यांपासून पदवीधर मतदार नोंदणीसाठी आवाहन केले होते. त्याला पदवीधरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. यामुळे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारीबाबत मोठ्या पक्षाकडून विचारणा करण्यात आली आहे. मात्र, एखाद्या पक्षातर्फे निवडणूक लढवणार की स्वतंत्र उमेदवार देणार याबाबत घोषणा करण्यात येणार आहे. आपण स्वतः उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
        सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असल्याने मोठा जनसंपर्क आहे. मराठा आंदोलनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. तसेच मतदारसंघातही आपले कार्यकर्त्यांचे जाळे आहे. याच जोरावर आपण मताधिक्य खेचू शकतो. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे रामभाऊ जाधव यांनी सांगितले

Comments are closed

error: Content is protected !!