सांगवी:- भारतीय संस्कृतीने मुक्तहस्ताने जगाला ज्या काही देणग्या दिलेल्या आहेत, त्यामधील योग ही सर्वात मोठी देणगी आहे. सद्यस्थितीला जगामध्ये २०० पेक्षा जास्त देशामध्ये योगाचा प्रचार व प्रसार चालू आहे. तसेच कोरोनासारख्या वैश्विक महामारी मुळे सर्वजण तणावामध्ये असताना आनंदी व तणावरहित जीवनासाठी योग या महत्त्वाच्या तत्वाला आत्मसात करणे आवश्यक आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमरानी यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्राचार्य महासंघ व प्रजापिता ब्रह्मकुमारी, बोपोडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्यांसाठी आयोजित ‘तणावमुक्त जगण्यासाठी ध्यानधारणा’ या विषयावर आयोजित एक दिवसीय वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब देशमुख, सचिव डॉ. सुधाकर जाधवर, संयोजक डॉ. नितीन घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य व वेबिनारचे संयोजक डॉ. नितीन घोरपडे यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे असलेला उद्देश व महत्त्व स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले की, प्रशासक म्हणून काम करत असताना प्राचार्यांना अनेक ताणतणावांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे तणावरहित जीवन जगण्यासाठी योग किंवा ध्यानधारणेचा कसा फायदा होईल या उद्देशाने हे वेबिनार आयोजित केल्याचे सांगितले.
महासंघाचे सचिव डॉ. सुधाकर जाधवर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील प्राचार्यांसाठी साठी महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगत राजयोग ध्यानधारणेमुळे जीवनशैलीमुळे होणाऱ्या बदलाबाबत स्वानुभव कथन करीत त्याचे महत्व स्पष्ट केले.
महासंघाचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब देशमुख यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्राचार्य महासंघाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व प्रश्न प्राचार्यांना सोडवावे लागतात त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित राहिलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या राजयोग ध्यानधारणा प्रशिक्षक बीके लक्ष्मी दिदी यांनी अतिशय उत्तमरित्या उपस्थितांना मार्गदर्शन करीत तणावरहित जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. योग व योगा या मधील फरक विचारांची शक्ती, मनस्थितीचा परिस्थिती वरील प्रभाव, तणावरहित जीवनामध्ये कुटुंबाचे व समाजाचे महत्तव, महर्षी पतंजली यांचे अष्टांग योग यावर विविध उदाहरणासहित सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित प्राचार्यांकडून ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून घेत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांची शंकानिरसन केले.
या वेबिनारचे आभार प्रदर्शन डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले.
तणावरहीत जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या विषयावर वेबिनार चे आयोजन केल्याबद्दल डॉ. एन. एस. उमरानी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र प्राचार्य महासंघाचे व विशेषतः कार्यक्रमाचे संयोजक डॉ. नितीन घोरपडे यांचे विशेष अभिनंदन केले.
सदर वेबिनार साठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आदि विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयातील सुमारे ७५ प्राचार्य सहभागी झाले होते.
बातमी साठी संपर्क:-
punetoday9news
पत्रकार:- सागर झगडे.
9922557929
punetoday9news@gmail.com
Comments are closed