मुख्यमंत्री म्हणतात मास्क बंधनकारक तर दुसरीकडे विविध कार्यक्रमात लोकप्रतिनिधी,प्रशासन अधिकारी विनामास्कचे फोटोसेशन करतात त्यामुळे कारवाई फक्त सामान्य नागरिकांवरच का ? असा प्रश्न मात्र उपस्थित.
मुंबई, दि.७(punetoday9news):- मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करताना मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुंबईत कोरोना उपचारासाठीच्या ज्या जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांची देखभाल दुरूस्ती करावी. जेणेकरून आगामी काळात गरज भासल्यास त्यांचा वापर करता येईल. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून राबविण्याचे विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज येथे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, जनतेला दिवाळी सुखाची जावी यासाठी आपण सर्वांनी सतर्कता बाळगत जनजागृतीच्या माध्यमातून कोरोनाचा धोका संपला नसल्याची जाणीव करून द्यावी. प्रदूषण कमी झाले नाही तर कोरोनाचे संकट कायम राहील ही बाब नागरिकांना पटवून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांमध्ये मास्क न वापरण्याबाबत बेफिकीरी दाखविली जात आहे. तसे न करता मास्क वापरण्याबाबत मोहीम अधिक तीव्र करावी. कायद्याचा धाक दाखवितानाच जनजागृतीवर अधिक भर देऊन मास्क वापरण्याचे आवाहन करावे, असेही ते म्हणाले .
Comments are closed