विभागप्रमुखांची आढावा बैठक.
पुणे दि.९(punetoday9news):- पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यक्रम व आचारसंहितेबाबतच आवश्यक माहिती देण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्षाच्या समन्वयक सुरेखा माने आणि निवडणूक यंत्रणेशी सबंधित अधिकारी उपस्थित होते.
शिक्षक व पदवीधर निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती देत सावंत म्हणाल्या, आदर्श आचारसंहितेचे उल्लघन होणा नाही याबाबत प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. सर्व मतदान केंद्रावर सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींगचे पालन यासह मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी, मतदार या सर्वांसाठी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनामार्फत राबवण्यात येणार असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.
उपजिल्हाधिकारी माने म्हणाल्या, निवडणूक कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून सर्व यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नियमानुसार कार्यवाही करावी, जेणेकरून कुठल्याही प्रकारे आचारसंहीता भंग होण्याचा प्रकार घडणार नाही. आयोगाने आचारसंहिता पालन करण्याबाबत निर्देशित केलेल्या सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करावे, असे सांगतानाच आचारसंहितेबाबत सविस्तर माहिती दिली.
Comments are closed