मुंबई दि. ९ (punetoday9news):- ओरोस (सिंधुदुर्ग) येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय महाविद्यालय जागेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय एकाच परिसरात व जागेवर असेल तर सर्वांसाठी सोयीचे होईल व सुविधांचा योग्य उपयोग करून घेता येईल. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नावाने असलेली जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तर वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने समन्वयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा प्रस्ताव (आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ, तांत्रिक उपलब्धता) तयार करून सादर करावा.
Advt:-
वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख म्हणाले, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग २० एकर जागा असणे आवश्यक आहे. सध्या जिल्हा रुग्णालयाकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी जागा आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जागा त्वरित हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी कोकणात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात यावी, अशी मागणी केली.
या महाविद्यालयासाठी २५ किमी दूर झारापच्या पर्यायी जागेचादेखील विचार करण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच वैद्यकीय महाविद्यालय उभारले जावे, असे नमूद केले.
Comments are closed