पुणे , दि. १२(punetoday9news):- पुणे जिल्ह्यातील येवलेवाडी, पिसोळी येथील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत शिवभोजन थाळी मंजूर करण्यासंदर्भात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ग्रामस्थांच्या गरजा समजून घेऊन संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. त्यानुसार येवलेवाडी पिसोळी येथील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत १ नोव्हेंबरपासून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे.



पुणे जिल्ह्यातील येवलेवाडी, पिसोळी येथे चार ते साडेचार हजार कुष्ठरोग्यांची वसाहत आहे.  याठिकाणी कुष्ठरोग्यांना शिवभोजन थाळी सुरू करण्यासंदर्भात माजी सरपंच मच्छिंद्र दगडे व  सामाजिक कार्यकर्ते  डेव्हिड वंगार हे वर्षभर प्रयत्न करत होते. कुष्ठरोग्यांना हाताने स्वयंपाक करता येत नसल्यामुळे त्यांना तयार जेवण उपलब्ध होणे आवश्यक होते. विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ग्रामस्थांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना या वसाहतीत शिवभोजन थाळी मंजूर करण्यासंदर्भात कळविले. त्यानंतर येथील वसाहतीत शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली. पुण्याचे  जिल्हा  पुरवठा अधिकारी यांनाही  यासंदर्भात निर्देश देण्यात आले.

शिवभोजन  थाळी  सुरू करण्यात आल्यामुळे कुष्ठरोग्यांची मोठी सोय झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड वंगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आभार मानले आहेत.


Comments are closed

error: Content is protected !!