मुंबई, दि. १७ ( punetoday9news):- मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ४६ वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला.
वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची स्थापना करणाऱ्या बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. भेदक व मनाचा ठाव घेणाऱ्या प्रभावशाली लेखनालादेखील त्यांच्या प्रखर भाषणांइतकीच प्रभावी धार होती.
१९६० मध्ये ‘फ्री प्रेस’मधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून बाळासाहेबांनी स्वत:चे ‘मार्मिक’ हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हक्काची पहिली लढाई सुरू झाली.
प्रबोधनकारांशी आणि सहकाऱ्यांशी दीर्घ विचारविनिमय झाला आणि १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात ‘शिवसेना’ नावाच्या संघटनेचा जन्म झाला. मुंबई व महाराष्ट्रातील मराठी माणूस शिवसेनेच्या मागे उभा राहिला.
स्थापनेनंतर ४ महिन्यांतच, ऑक्टोबरमध्ये मुंबईत शिवाजी पार्कवर पहिल्याच मेळाव्याला जवळपास ५ लाख लोकांची गर्दी झाली, तेव्हाच शिवसेनेच्या मान्यतेवर शिक्कामोर्तब झाले होते..!
पत्नी मीनाताई यांचे निधन, मुलगा बिंदुमाधव यांचा मृत्यू, शिवसेनेतील राजकीय बंडामुळे दूर होणारे निकटवर्तीय अशा अनेक प्रसंगांत त्यांचे हळवेपणही महाराष्ट्राने अनुभवले.
छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक अशी अनेक माणसे राजकीयदृष्टय़ा दुरावली, पण बाळासाहेबांच्या मोठेपणाच्या आठवणी या नेत्यांच्या मनाच्या हळव्या कप्प्यात आजही जिवंत आहेत, त्याचे हेच कारण!
‘शिवसैनिक हा माझा प्राण आहे, ही माझी संपत्ती आहे आणि ऊर्जा आहे’, असे सांगत सामान्य शिवसैनिकाच्या हृदयात घर करणाऱ्या या असामान्य नेत्याने आपल्या अखेरच्या भाषणातही, त्याचाच पुनरुच्चार केला होता.
Advt:-
Comments are closed