पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक.

 

पुणे,दि.१७(punetoday9news):- पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूकीचे काम निःपक्षपातीपणे आणि आत्मविश्वासाने पार पाडावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी केले.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघातून महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी निवडणूक-२०२० च्या अनुषंगाने पुणे विभागातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक निलिमा केरकेटा, निवडणूक निरीक्षक श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.





विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी. मतदान व मतमोजणी प्रक्रिया वेळेत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करा. कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर आदी दक्षता बाळगावी. मतदान केंद्रावर गर्दी होवू नये यासाठी रांग लावणे, मतदारांना माहिती देणे यादृष्टीने मतदान केंद्र व्यवस्थापनासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन त्यांना जबाबदारी नेमून द्या. मतदान केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घ्या. मतदारांना माहिती देण्यासाठी मतदार सहाय्यता कक्ष स्थापन करा, असे सांगून निवडणूक कामकाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघभावनेने काम करुन आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करावी, असेही राव यांनी सांगितले.




अपर जिल्हाधिकारी वर्षा लढ्ढा यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, मतदान अधिकाऱ्यांनी निवडणूक साहित्य ताब्यात घेताना तपासून घ्यावे, मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावरील पूर्वतयारी करावी. कोविड-१९ प्रादुर्भावामध्ये मतदान केंद्रावर खबरदारी घ्यावी. मतदानास सुरुवात होण्यापूर्वीची कामे वेळेत पार पाडावीत,असे सांगून मतदान केंद्राध्यक्षांची कर्तव्ये, फोटो ओळखपत्र नसणाऱ्या मतदाराची ओळख पटवण्यासाठी आवश्यक इतर पुरावे, मतदान प्रक्रियेमध्ये उद्भवणाऱ्या परिस्थिती, मतदान गुप्त राहण्यासाठी घ्यावयाची काळजी, दिव्यांग मतदारांसाठी मतदान, टपाली मतदान, मतदान झाल्यानंतरची कामे आदी बाबींची माहिती लढ्ढा यांनी दिली.

कार्यशाळेत उपस्थित मतदान अधिकाऱ्यांच्या शंकांचे विभागीय आयुक्त सौरभ राव व अपर जिल्हाधिकारी वर्षा लढ्ढा यांनी निरसन केले.

प्रस्ताविक उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी तर सूत्रसंचालन तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी केले. आभार उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी मानले.

Advt:- 

 

Comments are closed

error: Content is protected !!