आता बास… रे, बाबा!!! म्हणायची शेतकऱ्यांवर वेळ.
मुंबई, दि. १९(punetoday9news):- अगोदरच राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असताना हवामान खात्याने पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राच्या दक्षिण-पश्चिम आणि पूर्व भागात सध्या वाऱ्यांची चक्रीय स्थिती असून, कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. या पट्टय़ाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि त्यानंतर विदर्भ मराठवाडय़ासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दिवाळीपूर्वी राज्याच्या सर्वच भागांतील रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाल्याने थंडीचा कडाका जाणवत होता. पुण्यासह, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली. त्यामुळे या शहरांमधील थंडी गायब झाली असून ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. पुढील दोन दिवस शहर परिसरात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तर यावेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Advt:-
Comments are closed