मुंबई, दि. २७(punetoday9news): – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी (रविवार, दिनांक ६ डिसेंबर २०२०) तमाम अनुयायांनी मुंबईत दादर स्थित चैत्यभूमी स्मारक येथे येऊ नये आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने एकमताने करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयाच्या वतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त प्रणय अशोक, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, गजानन बेल्लाळे, स्वप्नजा क्षीरसागर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी म्हणून चंद्रकांत कसबे, रमेश जाधव, नागसेन कांबळे, भिकाजी कांबळे, रवी गरुड, प्रदीप व प्रतीक कांबळे, सचिन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महानगरपालिका प्रशासनातर्फे माहिती देताना सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, प्रतिवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा गांभीर्याने पालन करण्याचा व दुःखाचा दिवस आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदा चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुन अनुयायांनी अभिवादन करावे, अशी नम्र विनंती दिघावकर यांनी केली आहे.
शासनाने देखील सर्व अनुयायांना विनंती केली आहे की, कोरोना संसर्ग लक्षात घेता, सर्वांनी विचारपूर्वक व धैर्याने वागून सहकार्य करावे. यंदा घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन केले आहे.
महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला विविध आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने संमती दर्शविली. सर्व अनुयायी आपापल्या घरुन अभिवादन करतील, अशी ग्वाही या संघटनांनी दिली.
विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी आवाहन केले की, सर्व अनुयायांनी ‘राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन’ असा मजकूर लिहून आपले नांव, पत्ता, जिल्हा नमूद करुन चैत्यभूमी स्मारक, दादर (पश्चिम), मुंबई – ४०००२८ येथे पोस्टाने पत्र पाठवून अभिवादन करावे. या उपक्रमास देखील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला.
Advt:-
Comments are closed