पुणे,दि.२८(punetoday9news):- अलीकडच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात जातीय संघर्ष, अंधश्रद्धा, बेरोजगारी, गुन्हेगारी, व्यसनाधीनता वाढत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संविधानात्मक लोकशाही मूल्ये रुजवली जात नाहीत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (बार्टी) मार्फत संपूर्ण राज्यात बुद्धविहार, मंदिरे, चर्च, मस्जिद, गुरुद्वारा, जैन स्थानक आदी ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने संविधानाचे वर्ग सुरू करण्याची मागणी पँथर रिपब्लिकन पार्टी (एस) चे संस्थापक अध्यक्ष गौतम डोळस यांनी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्याकडे केली आहे.




भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रानंतर पँथर रिपब्लिकन पार्टी (एस)चे अध्यक्ष गौतम डोळस यांनी धम्मज्योती गजभिये यांना संघटनेच्या वतीने जागृती अभियान राबविण्यासंबंधीचे निवेदन दिले. पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष आशा लोळे, पुणे शहर युवा अध्यक्ष दत्ता फाले, पुणे शहर महिला आघाडी उपाध्यक्ष ज्योती ओंबळे, सुमन घोलप, बेबी कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
डोळस यांनी निवेदनात म्हटले आहे, की संविधानात्मक लोकशाही मूल्ये रुजविण्यासाठी धार्मिक प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी संविधानाचे वर्ग सुरू केल्यास समाजाला मोठा फायदा होईल. यामुळे सुसंस्कृत व सुजाण नागरिक निर्माण होतील. तसेच जातीय हिंसाचार, अत्याचार, व्यसनाधिनता, अंधश्रद्धा या अनिष्ट प्रथांना आळा बसेल. बार्टी संस्थेचे ५०० समतादूत राज्यातील विविध जिल्हे, तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत. या समतादूतांमार्फत हे अभियान प्रभावीपणे राबविल्यास लोकशाहीची मूल्ये जतन होतील व लोकशाही खर्‍या अर्थाने टिकेल.

Advt:-


Comments are closed

error: Content is protected !!