जिल्हाधिकारी कार्यालयात महा आवास अभियान कार्यशाळा
पुणे, दि.७ (punetoday9news):- राष्ट्रीय आवास दिनानिमित्त २० नोव्हेंबर २०२० ते २८फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ‘महा आवास अभियान- ग्रामीण’ राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात महा आवास अभियायातून घरकुल निर्मितीला गती देण्यासाठी मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभागामार्फत तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणेच्या प्रमुख अधिका-यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे, मानसी देशपांडे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ग्रामीण भागात महा आवास अभियानाला गती देत अधिकाधिक घरकुले बांधण्याचे नियोजन आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी समन्वयाने कामकाज करावे, या अभियाना अंतर्गत जागेअभावी प्रलंबित असलेल्या घरकुलाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी गतीने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. सर्वांनी मिळून मिशन मोडवर काम केले तर घरकुल अभियानात पुणे जिल्हयाचा चांगला ठसा उमटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे यांनी महा आवास अभियान गतीने राबवून पुणे जिल्हयाची नाविण्यपूर्ण उपक्रमात आघाडी घेवू, यासाठी तालुकास्तरावरून नियोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी महा आवास अभियानासंदर्भात सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेला तालुकास्तरावरील प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
Advt:-
Comments are closed