पुणे, दि.8(punetoday9news):- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले. त्यामुळे आता अनलॉक 1.0 अंतर्गत काही अटी व शर्तीच्या आधारे सुरू झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्या अनुषंगाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पिंपरी (तांत्रिक) रास्तापेठ पुणे या कार्यालयाच्या वतीने नोकरी इच्छुक बेरोजगार युवक युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील नामांकित आस्थापना, कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदाद्वारे संधी देण्यात येत आहे. इच्छुक युवक युवतींनी 9 डिसेंबर 2020 पर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी हणमंत नलावडे यांनी केले आहे.
या ऑनलाईन रोजगार मेळाव्यांतर्गत पुणे जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सर्वसाधारणपणे मशीन ऑपरेटर, वेल्डर, फिटर, शीटमेटल वर्कर, ऑटो मेकॅनिक, मेसन, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, कारपेंटर, ग्राईंडर, टर्नर, मशिनिस्ट, इंजिनिअरिंग डिप्लोमा मेकॅनिकल, ॲटोमोबाईल इंजिनिअर, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन पदवीधर यासारख्या पदांसाठी आवश्यक ती पात्रताधारक तसेच एसएससी, एचएससी, पदवीधर उमेदवारांसाठी एकूण 563 पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
सदरचा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, या संधीचा लाभ घेण्यासाठी आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाद्वारे लॉगीन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी आपला पंसतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपन्यांची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी जेणेकरून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे व संधीचा लाभ घेणे उद्योजक व उमेदवार यांना सहज शक्य होईल.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पंसतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण दिनांक व वेळ एसएमएसने कळविण्यात येईल व शक्य असेल तेथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. तरी इच्छुक युवक युवतींनी दि. 9 डिसेंबर 2020 पर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी हणमंत नलावडे यांनी केले आहे.
Advt:-
Comments are closed