पुणे दि.9(punetoday9news):- हवेली तालुक्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भिमा) येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साजरा केला जातो. यावर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव विचारात घेऊन हा कार्यक्रम शांततेने आणि संयमाने साजरा करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मौजे पेरणे (कोरेगाव भिमा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख व सचिन बारावकर तसेच पोलीस व संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, आपल्या राज्यासह देश आणि जग कोरोना विरुद्ध लढत आहे. अशा परिस्थितीत योग्य पध्दतीने अभिवादन कार्यक्रम साजरा करणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हा कार्यक्रम शांततेने आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साजरा करण्याबाबत येथील नागरिकांच्या भावना जाणून घेण्याच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात येत आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यावर्षी सर्व सण-समारंभ साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. पेरणे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घेऊन कार्यक्रम साजरा करुया, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केले.
यावेळी पेरणे व वढू येथील सरपंच, विविध संस्था- संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून गर्दी होवू नये, यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे .
Comments are closed