पिंपरी:- आजपर्यंत दिवसरात्र कामाच्या व्यापात व्यस्त असणारी आजची पिढी स्वास्थ संवर्धनाबाबत जागरूक झालेली दिसत आहे. शासनाने हलक्या व्यायाम प्रकारास नियमांच्या अधीन राहून परवानगी दिल्यानंतर शहरातील उद्याने, पदपथ, शहराबाहेरील रस्त्यावर सकाळी व्यायामासाठी चालणाऱ्या नागरिकांची वर्दळ दिसून येते. कोरोना विषयक खबरदारी घेत नागरिक व्यायाम प्रकार करताना पहावयास मिळते. महिला, जेष्ठ नागरिक तर नेहमीच विविध व्याधीपासून सूटका मिळावी म्हणून योगा, माॅर्निंग वाॅक करायचे मात्र आता युवा वर्ग ही प्रामुख्याने सहभाग नोंदवत शरीर संपत्ती जतन करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने आळशी म्हणवल्या जाणाऱ्या आजच्या युवा पिढीला नवचैतन्य प्राप्त होत आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वच भागात सकाळी आरोग्याची काळजी घेताना नागरिक करत असलेले प्रयत्न पहायला मिळतात. सद्यस्थितीतील परिस्थिती पाहता स्वच्छता व आरोग्य या विषयी नागरिक असेच जागरुक राहिले तर भविष्यात सुदृढ नागरिक व रोग प्रतिकार शक्ती वाढलेली पिढी बनल्यास कोरोना व अन्य आजारापासून नक्कीच दूर राहील.
प्रतिक्रिया:-
१. आरोग्य संवर्धनासाठी जिम चालू करण्यास परवानगी मिळावी. त्यामध्ये जिम चालक कोरोना संसर्ग टाळण्यासाठी फक्त १० लोकांना प्रवेश, प्रत्येक बॅच नंतर जंतूनाशक फवारणी, वेळ व व्यायाम बंधन , दोन व्यक्ती संपर्क टाळणे, हँडग्लोज बंधनकारक करणे असे सुरक्षेचे सर्व निकष पाळायला तयार आहेत.
– अविनाश रासगे, ( सातारा, पुणे “श्री” , खेळाडू, फिजिक इलाईट जिम संचालक )
२. कोरोना मुळे निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न
पाहता आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे चालणे, धावणे , योगासने असे हलके व्यायाम प्रकार करण्यावर भर दिला पाहिजे.
– संदीप भोयणे,( नागरिक)
३. शासनाचे नियम पाळून गिर्यारोहणास परवानगी मिळावी. नियमित गिर्यारोहणास जाणाऱ्या व्यक्तीला पास वगैरे ची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. – नितीन नवले( गिर्यारोहक, पिंपळे गुरव )
४. नियमित गिर्यारोहणास जाणारे गिर्यारोहक नेहमीच निसर्गाचे नियम पाळत असतात आपल्या पासून पर्यावरणाची कसलीही हानी होणार नाही याची दक्षता घेतली जाते.
– किरण घोरपडे ( गिर्यारोहक व पर्यावरण प्रेमी, पिंपळे सौदागर)
Comments are closed