पिंपरी,दि. १३(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व जय भगवान महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती मराठवाडा जनविकास संघाच्या प्रांगणात साजरी करण्यात आली. दरम्यान, अंध व अपंग व्यक्तींचे थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी त्यांना स्वेटर आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
ह.भ.प. बाबुराव तांदळे महाराज आळंदीकर, ह.भ.प. हनुमंत विघ्ने महाराज आणि मान्यवर यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष गणेश ढाकणे, खंडू खेडकर, हनुमंत घुगे, वनाधिकारी रमेश जाधव, अमोल नागरगोजे, जगन्नाथ शिंदे, संतश्रेष्ठ भगवानबाबा बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव सुवर्णा खेडकर, गणेश वाळुंजकर, हरीश सरडे, सुर्यकांत कुरूलकर, दत्तात्रय धोंडगे आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना अरुण पवार म्हणाले, की मुंडे यांच्या कार्याचा वसा घेऊन आपण हे समाजकार्य सतत चालू ठेवू. गोपीनाथ मुंडे हे जनसामान्यांचे नेते होते. त्यांचे कार्य आपणास निश्चितच प्रेरणादायी व बोधप्रद असेच होते. गोपीनाथ मुंडे हे संघर्षशील नेते होते. त्यांनी शेतकरी कामगार सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. स्वाभिमान व संघर्ष हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. मुंडे हे सर्वसामान्य जनतेचे आधारस्तंभ होते. उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात माझा गणपती दूध पीत नाही, असे ठणकावून सांगत अंधश्रद्धेचे काहूर शमविले होते. म्हणूनच त्यांना लोकनेते म्हणून ओळख मिळाली होती.
गणेश ढाकणे म्हणाले, की जय भगवान महासंघ आणि मराठवाडा जनविकास संघ यापुढे एकत्रित काम करतील. मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून होत असलेली कामे उल्लेखनीय आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, की गोपीनाथ मुंडे यांच्यावर भरभरून लिहिल्याविना महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच होऊ शकणार नाही. ते दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होते, तरी त्यांचे लक्ष महाराष्ट्राकडे असायचे. आज गोपीनाथ मुंडे हवे होते, अशा शब्दात आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
ह.भ.प. तांदळे महाराज यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत कुरुलकर यांनी केले, तर अरुण पवार यांनी आभार मानले.
Comments are closed