• राज्यातील सत्ताधारी; जेजुरीत कट्टर विरोधक.

• ‘जशास तसे’ ला ‘तशास तसे’ असा राजकीय सामना.

जेजुरी, दि. १४( punetoday9news):- पुणे जिल्ह्यातील जेजुरी शहरात सध्या राजकीय रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. आजी व माजी यांच्यात सोशल मिडिया वर तुफान शेरेबाजी चालू असून चक्क मोठमोठी पत्रके काढून एकमेकांविरूद्ध आरोप प्रतिआरोपांच्या फैली होताना दिसत आहेत. 

कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जेजुरी पर्यंत बससेवा सुरू झाली खरी पण कुणामुळे असा वाद चांगलाच चिघळून श्रेयवादाचे रूपांतर प्रत्यक्ष वादात होते की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

त्यामुळे हा राजकीय आखाडा जेजुरीतील नागरिकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. सध्याचे विरोधी बाकावर बसलेले व सत्तेच्या चाव्या हाती असलेले, दोन्ही नेते व कार्यकर्ते एकमेकांविरूद्ध बोलण्याची संधी सोडताना दिसत नाही.  याउलट प्रतिउत्तरातून पलटवार करत राजकीय आखाडा वाढून रंगतदार होताना दिसत आहे.

मात्र यात राजकीय टीका राजकीय पातळीवर न राहता राजकारणाची सीमारेषा ओलांडून वैयक्तिक पातळीवर घसरली जात असल्याने सामाजिक स्तरातून जेजुरीच्या सद्यस्थितीच्या राजकारणाविषयी चिंताही व्यक्त केली जात आहे.




जेजुरी शहरातील रस्ते, पाणी, वीज, शौचालय, वाहनतळ, भूमिगत गटारे या बाबतीत नागरिकांचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राजकीय नेते वर्चस्ववादाच्या लढाईतच व्यस्त असताना दिसत आहेत.  त्यामुळे नागरिकांच्या मुलभुत प्रश्नांची उत्तरे नागरिकांना प्रत्यक्षात  मिळणार की फक्त ‘सोशल मिडिया वाॅर’ च पहायला मिळणार असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

Advt:-

 

Comments are closed

error: Content is protected !!