मुंबई,दि.१४(punetoday9news):- महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले पण विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त १२ जागा रिक्तच असल्याने राजकीय वर्तुळात राज्यपालांची चांगलीच चर्चा आहे. यात संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी राज्यपाल नियुक्त १२ जागांचा मुद्दा उपस्थित केला.ते म्हणाले , “लोकशाहीला बेशुद्ध करण्याचे काम करू नये या सुधीर मुनगंटीवार यांच्या मताशी मी सहमत आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांची नियुक्ती अद्याप झालेली नाही,” त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले कि “राज्यपालांनी काय करावं हे पक्ष ठरवतो का? हा त्यांचा निर्णय आहे. अनिल परब हे संसदीय कार्यमंत्री आहेत आणि वकील आहेत. त्यांना इतकं माहिती असलं पाहीजे,”
मात्र पुन्हा एकदा राज्यपालनियुक्त १२ जागांचा मुद्दा उपस्थित झाला आहे , महाराष्ट्रातील राजकारण सध्या वेगळ्या स्थितीतून जात असून वारंवार विचित्र वळणे पाहायला मिळत आहेत . अधिवेशनात कुठली विधेयके मांडणार, अध्यादेश आणणार याबाबत माहिती देण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त रिक्त जागांबाबत नाराजी व्यक्त केली आहे .
विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी नियुक्ती करण्याचा अधिकार घटनेने राज्यपालांना दिला आहे. पण ही नियुक्ती करत असताना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेण्यात यावा, असंही घटनेत स्पष्ट केलेले आहे. याच मुद्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, “राज्य सरकारने शिफारस केली आहे आणि राज्यपालांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. घटनात्मक तरतूदीप्रमाणे मंत्रिमंडळाने शिफारस केली आहे. त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे. यात राज्यपालांना काही आक्षेप असतील तर तसे त्यांनी लेखी कळवले पाहिजे. त्यांना तसा अधिकार आहे.”
आता या जागा राज्यपाल नियुक्त करणार कि अजून काही अवधी घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Comments are closed