पुणे, दि.२१(punetoday9news):- आज सोमवारी रात्री आकाशात शनी व गुरू हे दोन ग्रह अगदी जवळजवळ दिसतील. वास्तविक शनी व गुरूची युती ही दर 20 वर्षाने होते. परंतु, हे दोन ग्रह इतक्या जवळ येण्याची घटना 800 वर्षांनंतर यावर्षी पाहावयास मिळणार आहे. यापूर्वी अशी महायुती 1226 मध्ये पाहावयास मिळाली होती.
वास्तविक शनी व गुरू या दोन ग्रहांच्या कक्षेत सरासरी 6 कोटी किलोमीटरचे अंतर आहे. परंतु, त्यांची कक्षेत फिरण्याची विशिष्ट गती व आपल्या दृष्टीने त्यांचा बदललेला कोन यामुळे हे दोन्ही ग्रह आपल्याला चिटकून असल्यासारखे भासतील. त्यालाच ग्रहांची ‘महायुती’ असे म्हणतात.
महायुतीच्या दिवशी योगायोगाने वर्षातला सर्वांत लहान दिवसही आहे. यावेळी या दोन ग्रहांमध्ये फक्त 0.1 डिग्रीचे अंतर असेल. तसे पाहता 1623 मध्येही ही घटना घडली होती. परंतु, त्यावेळी सूर्य सानिध्यामुळे ही युती पाहता आली नाही.
यापुढे 31 ऑक्टोबर 2040, 7 एप्रिल 2060, 15 मार्च 2080 व 18 सप्टेंबर 2100 रोजी होईल. त्यापैकी 15 मार्च 2080 रोजी या दोन ग्रहांमधील अंतर आजच्या इतके कमी राहील. म्हणजेच हे दोन ग्रह इतके जवळ पाहण्यासाठी पुढील 60 वर्षे वाट पहावी लागणार आहे.
आज शनी व गुरू आकाशात जवळ दिसणार असले तरी प्रत्यक्षात या दोघांत करोडो किलोमीटरचे अंतर असेल. आकाशात ग्रह जवळ दिसतात. मानवजातीवर त्याचे कोणतेच अनिष्ट परिणाम होत नसतात. त्यामुळे या सर्व अवकाशीय पिंडांचे निरीक्षण करून वस्तुस्थिती समजून घ्यावयास पाहिजे.
Comments are closed