नंदुरबार,दि.२४(punetoday9news):- सरपंच पद बिनविरोध करण्याच्या नादात अप्रत्यक्षरीत्या बोली लावून सरपंच पदच विकत घेतल्याचा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी येथे घडला आहे. येथील वाघेश्वरी माता देवीवर श्रद्धा आणि एकदा तरी सरपंचपद घरात यावे यासाठी गावातील मंदिराला तब्बल ४२ लाख रुपयांची देणगी देऊन ५ वर्षांसाठी ग्रामपंचायत सांभाळण्याची तयारी येथील प्रदीप वना पाटील यांनी दर्शविली. मात्र लोकशाही साठी हि बाब नक्कीच निंदनीय मानली जाणार यात शंकाच नाही. अशा प्रकारे धनदांडगे पैश्याचा जोरावर विकासाचे आमिष दाखवून कोणतीही पदे घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत त्यामुळे बिनविरोध निवडणूक च्या नावाखाली घडणारा हा प्रकार लोकशाहीला मारक ठरेल त्यामुळे सरकारने अशा प्रकारे बिनविरोध निवडणूक करण्याच्या पद्धतीला परवानगी देऊ नये असेही बोलले जात आहे.
‘अशी’ लागली सरपंचपदाची बोली-
खोंडामळी येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील हा लिलाव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. साधारणत: ५ हजार लोकसंख्येच्या या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. ४ प्रभाग आणि १३ सदस्य असलेल्या या गावात यंदा निवडणूक बिनविरोध करावी, असे काहींचे म्हणणे पडले. त्यासाठी गावातील वाघेश्वरी माता मंदिर उभारणीला जो जास्त देणगी देईल त्याच्याकडे ग्रामपंचायत सुपूर्द करावी, असे ठरविण्यात आले.
सर्व पक्षांकडून २५ लाखांपासून ३८ लाखांपर्यंत बोली गेली. ग्रामपंचायत एकदा तरी आपल्या ताब्यात यावी आणि सरपंचपद आपल्या घरात यावे यासाठी प्रदीप वना पाटील यांनी इच्छा व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले पाटील यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनीही प्रोत्साहन दिले, आणि ४२ लाखांवर त्यांनी बोली लावून ती अंतिम केली. या पैशातून मंदिराची उभारणी केली जाणार आहे.
तसेच, पाटील हे ठरवतील तेच सदस्य बिनविरोध घेतले जाणार आहेत. त्यांना ४ अपत्ये असल्याने ते स्वत: किंवा त्यांच्या पात्र ठरू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलीला सरपंचपदावर विराजमान करावे लागण्याची शक्यता आहे.
गावातील काही घटकांनी याला आक्षेप घेतला. परंतु गाव विकासासाठी व गावाच्या एकीसाठी त्यांचाही विरोध मावळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणखी काय घडामोडी घडतात याकडे आता लक्ष लागून आहे.
Comments are closed