पुणे,दि.२५(punetoday9news):- पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा भीमा कोरेगावसह नजीकच्या गावांमध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 पर्यंत नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.




विजयस्तंभाच्या ठिकाणी 1 जानेवारी रोजी लाखो नागरिक येत असतात. भीमा कोरेगावमध्ये जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काढले आहे.

भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या कार्यक्रमाचे प्रसारण 1 जानेवारीला दिवसभर दूरदर्शन आणि समाज माध्यमांवर केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




पुणे जिल्ह्यातील ‘या’ गावांमध्ये नागरिकांना प्रवेशबंदी असून  भिमा कोरेगावच्या जवळील लोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी, वढू खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या गावांमध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 सकाळी 6 वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारीला देशभरातले अनुयायी येत असतात. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!