पुणे, दि.२५(punetoday9news):- महापारेषणच्या रास्तापेठ जीआयएस (Gas Insulated Substation) 132 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये शनिवारी (दि. 26) सकाळी 8 वाजेपासून ते रविवारी (दि. 27) रात्री 8 वाजेपर्यंत पूर्वनियोजित देखभाल दुरुस्तीचे विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे महावितरणच्या एकूण 6 उपकेंद्रांचा वीजपुरवठा 36 तास बंद राहणार असल्याने या उपकेंद्रांसह शहरातील मध्यवर्ती परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
महापारेषणच्या 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद राहणार असल्याने महावितरणला सुमारे 60 ते 65 मेगावॉट विजेचे भारव्यवस्थापन करावे लागणार आहे. विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्यास किंवा पर्यायी व्यवस्थेमधील वीजवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास शहराच्या मध्यवर्ती परिसरात चक्राकार पद्धतीने दीड ते दोन तासांचे भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. मात्र ही परिस्थिती उद्भवूच नये यासाठी मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी तांत्रिक आढावा घेतला असून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सतर्क राहून युद्धपातळीवर प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी संबंधितांना केल्या आहेत.
महाराष्ट्रातील पहिले जीआयएस 132 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र नऊ वर्षांपूर्वी महापारेषणकडून रास्तापेठ येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. या उपकेंद्रातील पूर्वनियोजित मेनबस व गॅस चेंबर तसेच इतर तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे कामे तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनात दि. 26 ते 27 रोजी करण्यात येणार आहे. या उपकेंद्राचा वीजपुरवठा 36 तास बंद राहणार असल्याने महावितरणच्या रास्तापेठ, पद्मावती व पर्वती विभाग अंतर्गत कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, रास्तापेठ, भवानी पेठ, नाना पेठ, जुना मोदी खाना, कॅम्पचा काही परिसर, गुलटेकडी, गंजपेठ, सॅलिसबेरी पार्क, घोरपडे पेठ, डायस प्लॉट, लोहियानगर, हाईडपार्क, महर्षीनगर, मुकुंदनगर या परिसरामध्ये महावितरणच्या इतर उपकेंद्रांद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज आहे. तथापि भारव्यवस्थापन शक्य न झाल्यास किंवा पर्यायी व्यवस्थेमधील वीजपुरवठ्यात तांत्रिक अडचण उद्भवल्यास नाईलाजास्तव चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण व महापारेषणकडून करण्यात आले आहे.
Comments are closed