दिल्ली,दि.२९(punetoday9news):- कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने एक आदेश जारी करत 1 जानेवारीपासून सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे.
जून महिन्यामध्ये केंद्र सरकारने कांदा हा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळला होता. मात्र भाव वाढल्यानंतर पुन्हा निर्यातबंदी जाहीर केली होती.
केंद्र सरकारने १४ सप्टेंबर २०२० रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
देशातील कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारात सतत वाढणार्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
९ ऑक्टोबर २०२० रोजी ‘बंगलोर रोझ’ आणि ‘कृष्णापुरम कांदा’ या दोन कांद्यांच्या जातींच्या निर्यातीवरील बंदीदेखील १ जानेवारीपासून काढून टाकली जाणार आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, भाजप खासदार भारती पवार, डॉ. सुभाष भामरे यांनी सातत्याने वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या खासदार भारती पवार यांनीही वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे निर्यात बंदी उठवावी आणि व्यापाऱ्यांवर साठेबाजीच्या बाबतीत लावण्यात आलेले निर्बंध उठवावे, अशी मागणी केली होती.
Comments are closed