मुंबई, दि.२९(punetoday9news):-  टोकियो येथील २०२१ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ५ खेळाडू वीरांची निवड झाली आहे. हे खेळाडू म्हणजे राज्याचे वैभव आहे. ते वाढविण्याची जबाबदारी सरकारची आहे. खेळाडूंचे पालकत्व सरकारने घेतले आहे. आपले सरकार नेहमी खेळाडूंच्या पाठीशी राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना पूर्वतयारीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी ५० लाख रुपये असे २.५० कोटी रुपये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले.




यावेळी शुटींग १० मीटर एअर रायफल स्टँडींग कॅटेगरी – एस एच १ चे खेळाडू स्वरुप उन्हाळकर (पॅरा ऑलिंपिक), शुटींग २५ मीटर स्पोर्टस पिस्टलच्या खेळाडू राही सरनोबत, शुटींग ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या खेळाडू तेजस्विनी सावंत, आर्चरी रिकर्व्हर सांघिकचे खेळाडू प्रवीण जाधव, ॲथलेटिक्स ३००० मीटर स्टिपलचे खेळाडू अविनाश साबळे यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य  वितरित करण्यात आले.

 

मुख्यमंत्री म्हणाले की, ऑलिम्पिकमध्ये पदके मिळत नाहीत तर मिळवावी लागतात. खेळाडूंना परिश्रमाबरोबरच एकाग्रताही महत्त्वाची असते. हे राज्याचे वीर ऑलिंपिकमध्ये नेत्रदीपक यश संपादन करतील आणि राज्यासह देशाचा मान वाढवतील अशी अपेक्षा व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, निवडण्यात आलेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य वितरणाचा कार्यक्रम भव्य स्वरुपात करण्याचा सरकारचा विचार होता. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी पद्धतीने करावा लागत आहे. हे खेळाडू ऑलिंपिकमध्ये पदक जिंकून आल्यानंतर राज्यासह देशाला अभिमान वाटेल . भविष्यातही क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासराठी सरकार नेहमी प्रयत्नशील राहणार आहे. खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

क्रीडा राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे म्हणाल्या, महिला व मुलींना खेळामध्ये प्रोत्साहन देण्याकरिता  ‘गो-गर्ल -गो’ ही योजना सुरु करण्यात आली आहे.

यावेळी शुटींग-२५ मीटरच्या खेळाडू राही सरनोबत यांनी मनोगतात सांगितले की, आम्ही सर्व खेळाडू पदके जिंकण्यासाठी परिश्रम घेत आहोत. सरकारही पाठीशी असल्याने आम्ही कठोर परिश्रम घेऊन पदके जिंकून राज्याचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करु.




यावेळी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनीही मनोगत व्यक्त केले. क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी उपस्थितांचे आभार मानले.

#

Comments are closed

error: Content is protected !!