मुंबई, दि.३०(punetoday9news):- सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत वीज चोरीला आळा घालावा आणि महावितरणचा महसूल वाढवावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
सुरक्षा व अंमलबजावणी विभागाला बळकटी प्रदान करुन महावितरण कंपनीचा महसूल वाढविण्याच्या अनुषंगाने वीज कंपनीच्या फोर्ट मुंबई स्थित कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी भरारी पथकाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
राज्यात वीज चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी थकबाकीपोटी ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे, त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी. अनधिकृत वीज वापराला आळा घालावा. बांधकाम प्रकल्पासाठी तात्पुरत्या वीज जोडणी घेणाऱ्या ग्राहकाला प्रीपेड मीटर व एएमआर मीटर बसवावे, त्या ठिकाणच्या वीज वापराची नियमित तपासणी करावी व वीज चोरीची माहिती देणाऱ्याला बक्षिसे द्यावीत, आदी सूचना डॉ. राऊत यावेळी दिल्या. वीजचोरीला अभय देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
खाजगी वीज वितरण कंपन्या व सार्वजनिक वीज वितरण कंपन्या यांचा तुलनात्मक अभ्यास करून वीज चोरीला आळा घालण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करुन ग्राहकांच्या वीज वापरांचे विश्लेषण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या विभागाने वीज चोरी कमी करण्याचे लक्ष्य ठरवून त्याची अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही डॉ.राऊत यांनी केली.
Comments are closed