मुंबई, दि. ३१(punetoday9news) :-  महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये कार्यरत असणाऱ्या लता बन्सोले या मूळच्या अमळनेरकर. या रणरागिणीने नुकतीच आपल्या जीवाची पर्वा न करता लोकलसमोर पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीमती बन्सोले यांना मंत्रालयात बोलावून त्यांचा विशेष सत्कार केला.



मंत्री  पाटील यांनी लता बन्सोले यांच्या धाडसाचे  कौतुक केले. महिला आज सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून त्या धाडसातही मागे नाहीत हे श्रीमती बन्सोले यांनी पुन्हा एकदा सिध्द केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्या जळगाव जिल्ह्यातील असल्याने आपल्याला विशेष आनंद झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहसंचालक भीमराव कोरे व सुरक्षा पर्यवेक्षक प्रांजली जाधव उपस्थित होते.




मूळच्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील लता विनोद बन्सोले या मुंबई येथे सुरक्षा दलात कार्यरत आहेत. गत शनिवारी सकाळी मुंबईतल्या ग्रँट रोड रेल्वे स्थानकावर असताना त्यांच्यासमोरील एक प्रवासी अचानक चक्कर येऊन रेल्वे ट्रॅकवर पडला. यातच समोरून वेगाने लोकल येत होती. यावेळी लताताईंनी आपल्या प्राणाची पर्वा न करता रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली. त्यांनी तातडीने त्या व्यक्तीला बाजूला काढून समोरून येणाऱ्या लोकलच्या चालकाला थांबण्याचा इशारा केला. यामुळे त्या लोकल चालकाने गाडी थांबविली आणि त्या प्रवाश्याचे प्राण वाचले.

Comments are closed

error: Content is protected !!