पुणे, दि.२(punetoday9news):- राज्याचा सर्वांगीण विकास होत असताना वाढते नागरिकरण विचारात घेत पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

भामा आसखेड प्रकल्पामुळे पुणे शहरातील पाण्याची अडचण दूर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे महानगरपालिका सभागृहात भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचे ऑनलाईन पदधतीने लोकार्पण करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, आ.चंद्रकांत पाटील, आ. भीमराव तापकीर, आ.चेतन तुपे, आ.सुनिल कांबळे, आ. सुनिल टिंगरे, आ.मुक्ता टिळक, माजी आ. जगदीश मुळीक, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, उपमहापौर सरस्वती शेंडगे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टिने राज्य शासन कायम प्रयत्नशील आहे. भामा- आसखेड प्रकल्पामुळे पुणे शहरातील पूर्व भागातील पाण्याची अडचण दूर होणार आहे. नदी सुधार प्रकल्प, जायका प्रकल्प महत्त्वाचे असून ज्या शहरात पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळते ती शहरे झपाट्याने वाढतात, त्यामुळे पाणी व्यवस्थेसोबतच शहरातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे सांगतानाच शहराचा विकास करताना प्रत्येक घटकाचा विचार केला जाईल त्यांचेही प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वांनी एकत्रित येऊन लोककल्याणाची कामे करायची असतात. आज या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुणेकरांचा एक मोठा प्रश्न मार्गी लागतो आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया यावर मोठा भर देण्यात आला. तो याहीपुढे कायम ठेवला पाहिजे. त्यातून सिंचनाच्या पाण्यावर ताण येणार नाही. पुण्यातील प्रदूषण कमी करायचे असेल तर वाहतुकीच्या विविध साधनांकडे अगत्यपूर्वक लक्ष द्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.




आ.चंद्रकांत पाटील म्हणाले, भामा-आसखेड ही पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज या योजनेमुळे पूर्ण होण्यास मदत होणार आहे.




महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भामा-आसखेड प्रकल्पामुळे पूर्वभागाचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याचे सांगताना केंद्र, राज्य व पुणे महानगरपालिका यांच्या निधीतून ही योजना साकारल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भामा-आसखेड प्रकल्प पूर्ण करण्यात योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक,नागरिक,स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!