परिस्थिती गंभीर पण बदल आवश्यक.
पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
मुंबई, दि.२( punetoday9news):- पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हा केवळ सरकारी उपक्रम न राहता ती प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहीजे. ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविताना यामध्ये प्रत्येकाने सहभाग द्यावा व त्यातून याला लोकचळवळीचे स्वरुप देण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ‘माझी वसुंधरा ई-शपथ (ई-प्लेज)’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा ऑनलाईन कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या उपक्रमात सहभागी होत राज्याच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मी कटीबद्ध राहीन, अशी ई-शपथ घेतली.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, नव्या वर्षाची सुरुवात कशी करावी याची एक नवीन वाट पर्यावरणाच्या रक्षणासाठी शपथ घेऊन या कार्यक्रमातून दिली गेली आहे. या अभियानातून फक्त देशालाच नव्हे तर जगालाही पर्यावरण संवर्धनाची एक नवीन दिशा मिळेल. कोरोनाच्या संकटाने आपल्याला अनेक गोष्टी शिकविल्या. लॉकडाऊनच्या काळात सर्वच ठिकाणी प्रदुषणामध्ये मोठी घट झाली होती.
पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी य काही उदाहरणे दिली. ते म्हणाले की, पुर्वी आम्ही चित्रकला स्पर्धा घेत असू, तेंव्हा उगवणाऱ्या सुर्याचे चित्र काढत असताना अनेक मुले दोन डोंगरांमधून उगवणाऱ्या सुर्याचे चित्र काढत असत. पण आता मुले हेच चित्र दोन इमारतींच्या मधून उगवणाऱ्या सुर्याचे चित्र काढतात. ही परिस्थिती धोकादायक असून नद्या, डोंगर, निसर्ग, पर्यावरण या सर्वांची भावी पिढीसाठी जपणूक करण्याची आपल्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे.
आपण विकास करताना झाडांची कत्तल करतो आणि तोच विकास झाल्यानंतर रस्त्यांवर ऑक्सीजन मिळविण्यासाठी यंत्राचा वापर करतो. विकासातील हा असमतोल दूर करुन पर्यावरणपुरक अशा शाश्वत विकासाची कास आपल्याला धरावी लागेल. यासाठी राज्यात पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाला संपूर्ण पाठबळ देऊ, असे त्यांनी सांगितले.
Comments are closed