पिंपरी, दि. ४(punetoday9news):- खेळांची जननी समजल्या जाणाऱ्या ॲथलेटिक्स (मैदानी खेळ) या क्रीडा क्षेत्रात खेळाडू म्हणून सुरू झालेला मधु (आप्पा) देसाई यांचा प्रवास खेळाडू, क्रीडा कार्यकर्ता, प्रशिक्षक, मार्गदर्शक, पंच, संयोजक असा अजूनही सुरूच आहे. तब्बल ५० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत पिंपरी-चिंचवड शहराचे देसाई यांनी ॲथलेटिक्सचे ‘सुवर्ण पर्व’ निर्माण केले आहे. सत्तरीकडे झुकलेल्या देसाई यांचा उत्साह तरूणांना लाजविणारा आहे.
सन १९७० पासून शालेय जीवनात कबड्डीसह खो-खो आणि ॲथलेटिक्स मध्येही त्यांनी मैदान गाजवले. क्रॉसकंट्री, रोड रेस, लांब पल्ल्याच्या शर्यती (मॅरेथॉन), उंच उडी या क्रीडा प्रकारात त्याची विशेष रूची. फत्तेचंद जैन (संघवी केशरी महाविद्यालय), नौरोजी वाडीया, सिंबायोसिस विधी या महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व करीत यश प्राप्त केले.
नवोदित खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळावे, ॲथलेटिक्सचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून त्यांनी सन १९७९ साली पिंपरी -चिंचवड स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली. क्लबतर्फे खेळलेल्या जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची संख्या बरीच मोठी आहे तसेच अनेक जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पंच या क्लब तर्फे तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
ॲथलेटिक्सचे कार्य पिंपरी-चिंचवड शहरापुरते मर्यादित न राहता ते राज्यभर पसरावे म्हणून सन १९८१ ला सांगली ते पिंपरी अशी २७५ किलोमीटर अंतराची रोड रिले स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आणि ते १४ तास १३ मि. मध्ये पूर्णही केले. संयोजक म्हणून देसाई यांचे ते यशस्वी पर्दापण होते. सन १९८२ ला राष्ट्रीय ॲथलेटिक्स पंच परीक्षा उत्तीर्ण होऊन पंच म्हणून त्यांनी सहभाग वाढविला. जिल्हा, राज्य, राष्ट्रीयस्तरावरील शेकडो ॲथलेटिक्स, क्रॉसकंट्री, रोड रेस, मॅरेथॉन, चालणे आदी स्पर्धेत पंच, पंचप्रमुख, तांत्रिक अधिकारी, निवड समिती पदाधिकारी, संघाचे मार्गदर्शक व व्यवस्थापक आदी पदे सांभाळत संपूर्ण भारत देश त्यांनी पादाक्रांत केला आहे. संस्थेच्या माध्यमातून ॲथलेटिक्ससोबतच इतर खेळांतील प्रशिक्षक, खेळाडू व क्रीडा शिक्षकांना गौरविण्यात आले आहे. संस्थेसोबत पिंपरी-चिंचवड क्रीडा प्रतिष्ठाण (सहसचिव), पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना (उपकार्याध्यक्ष), ॲथलेटिक्स असोशिएशन ऑफ पिंपरी-चिंचवड (कार्याध्यक्ष) या माध्यमातून त्याचा संचार सुरू आहे.
उत्कृष्ट पंच म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. राज्य शासनाच्या जिल्हा गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार तसेच, परशुरामियन्स उत्कृष्ट ‘क्रीडा संघटक’ व ‘जीवन गौरव पुरस्कार,’ जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचा तब्बल ६ वेळा उत्कृष्ट पंच पुरस्कार, क्रीडा महर्षी बा. प्रे. झंवर स्मृती गौरव प्रेरणा पुरस्कार, शिवछत्रपती प्रतिष्ठानचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ यासह अनेक संस्था व संघटनांनी त्यांना सन्मानित केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतून सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी ॲथलेटिक्स क्षेत्रातील कार्य अविरत सुरूच ठेवले आहे. क्रीडा क्षेत्रासाठी त्यांचे कार्य लाख मोलाचे आहे. या वयातही ते स्पर्धा संयोजनात तरूणांना लाजवेल, असा उत्साह दाखवीत आहेत. त्यांचा दांडगा उत्साह, चिकाटी, खेळाप्रती असलेले प्रेमभाव नवोदित खेळाडूंसह क्रीडा क्षेत्राला नवी चालना देणारी आहे.
Comments are closed