पिंपरी, दि. ५(punetoday9news):- सध्याच्या परिस्थितीत घर घेणे आवाक्याबाहेरेचे आहे. सर्वसामान्यांसाठी आपल्या हक्काचे घर असावे अशी आशा असते. त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घरकुल योजना राबविण्याचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून घर मिळाल्यानंतर लाभार्थ्यांचे जीवनमान निश्चितपणे उंचावले जाणार आहे असे मत महापौर माई ढोरे यांनी केले.
केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखलीतील प्राधिकरण सेक्टर क्र. १७ आणि १९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या घरकुल प्रकल्पातील ३ सोसायट्यांच्या इमारती मधील एकूण १२६ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सदनिका वाटप सोडत आज महापौर ढोरे यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर मध्ये झालेल्या या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर सुधारणा समिती सभापती सोनाली गव्हाणे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुनिता तापकीर, शारदा सोनवणे, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, कार्यालयीन अधिक्षक संभाजी घुले, मुख्य लिपिक सुनिल माने यांच्यासह या विभागातील राजेश जाधव, सुजाता कानडे, दिपक पवार, संदिप भागवत, योगिता जाधव, अंजली खंडागळे तसेच समन्वयक दर्शन शिरूडे आदींसह लाभार्थी उपस्थित होते.
महापौर ढोरे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहराला झोपडपट्टी विरहीत शहर करून प्रत्येकाला स्वत:चे हक्काचे घर देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी घरकुल योजना सुरू करण्यात आली. या योजनाचा लाभ अनेकांना होत आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप पारदर्शक पध्दतीने करण्यासाठी सर्वांच्या उपस्थितीत संगणकीय सोडत काढण्यात आली. मिळालेले घर प्रत्येकाने व्यवस्थित सांभाळले पाहिजे. आपल्याला मिळालेले घर आपणांस नक्कीच सकारात्मक उर्जा आणि समाधान देईल. मात्र मिळालेले घर कोणीही विकू अथवा भाड्याने देऊ नका. महानगरपालिकेचे यावर सतत लक्ष असेल असे करणां-यावर कारवाई केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कोरोना काळात सर्वांनी नियमांचे पालन करावे. आपल्या शहराला अधिक चांगले बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहनही महापौर ढोरे यांनी यावेळी केले.
पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, शहरीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तसेच विविध प्रकल्पामुळे बाधित होणा-यांसाठी महापालिकेने घरे उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे. या योजनांना अधिक गती देण्याचा प्रयत्न केला जाईल, लाभार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रत्येकाला घर मिळेल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू असेही ढाके म्हणाले. प्रा. सोनाली गव्हाणे यांनी देखील यावेळी मनोगत व्यकत केले.
यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना सोसायटी क्रमांक १३७ इमारत क्रमांक सी-२४ चे प्रतिनिधी अर्जुन शिंदे, सोसायटी क्रमांक १३८ इमारत क्रमांक सी-१३ चे प्रतिनिधी बाबाजी वाळुंज, सोसायटी क्रमांक १३९ इमारत क्रमांक डी-३० चे प्रतिनिधी अशोक कासुळे यांना संगणकीय सदनिका सोडतीची यादी महापौरांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली.
सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. तसेच घराचा वापर, येणारे देयके आणि बँकेचे हप्ते वेळेवर भरण्याबाबत मार्गदर्शन केले. माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
Comments are closed