मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अशा कठीण प्रसंगी संपूर्ण प्रशासन दुर्दैवी कुटुंबांच्या पाठीशी असून प्रत्येक बालकाच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. आगीच्या कारणांचा शोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
भंडारा दि. 9( punetoday9news):- भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटला रात्री उशिरा आग लागल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळावर तैनात आहे. या अपघातात बळी पडलेल्या बालकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले तर अन्य बालकांना सुरक्षित बाहेर काढून या प्रत्येक बालकावर उपचारासाठी स्वतंत्र पथक देण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेतून 7 बालकांना वाचविण्यात यश आले. मात्र 10 बालकांचा मृत्यू झाला. दगावलेल्या बालकांचे मृतदेह आज सकाळी कुटुंबांच्या स्वाधीन करण्यात आले. पीडित कुटुंबासोबत एक पथक जिल्हा प्रशासनाने सोबत दिलेले आहे. तर या दुर्घटनेतून बचावलेल्या बालकांच्या उपचारात कोणतीही हेळसांड होऊ नये, यासाठी प्रत्येक बालकासोबत एक नर्स व डॉक्टरांचे पथक देण्यात आले आहे. या सर्व बालकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
Comments are closed