उत्तराखंड,दि. ७( punetoday9news):- उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात जोशीमठच्या रेणीतील ऋषीगंगा प्रोजेक्टजवळ ग्लेशियर (हिमकडा) कोसळल्याची घटना घडली आहे.
त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनमध्ये वीज प्रकल्प वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून मदत व बचावकार्य सुरू झाले आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत म्हणाले की, चामोली जिल्ह्यात आपत्तीची घटना समोर आली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना या परिस्थितीला सामोरे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष करा. सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे.
तपोवन परिसरातील रेणी गावात वीज प्रकल्पाजवळ अचानक झालेल्या हिमस्खलनानंतर धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. चामोली जिल्हाधिकाऱ्यांनी धौलीगंगा नदीच्या काठी वसलेल्या गावातील लोकांना बाहेर काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी व पोलिस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले आहेत.
Comments are closed