पुणे,दि.७ (punetoday9news) : ऑनलाइन भाडेकरार नोंदवण्यात भाडेकरू व घरमालकांना अडचणी येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन भाडेकरारास प्राधान्य दिले जात असले तरी होत असलेल्या विलंबामुळे नागरिक त्रस्त आहेत . याच पार्श्वभूमीवर भाडेकराराचे दस्त नोंदणीसाठी प्राप्त झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत दस्त नोंदणी करण्याचे आदेश नोंदणी उपमहानिरीक्षक हिंमत खराडे यांनी दिले. तसेच दस्त नोंदणीसाठी आलेल्या भाडेकरारांची संख्या जास्त असल्यास शनिवार आणि रविवारी सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भाडेकराराचे दस्त दुय्यम निबंधक कार्यालयांकडे पाठवल्यानंतर नागरिकांना सध्या दस्त मिळण्यास विलंब होत आहे. यासाठी दोन ते तीन आठवडे सतत पाठपुरावा करण्याचा त्रास नागरिकांना होत आहे. याबाबत असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटच्या शिष्टमंडळाने उपमहानिरीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानुसार याबाबतचे लेखी आदेश राज्यातील सह जिल्हा निबंधकांना दिले आहेत.
असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटचे अध्यक्ष सचिन शिंगवी म्हणाले, ‘भाडेकरारांच्या दस्त नोंदणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद झाल्यास दावा दाखल करण्यासाठी भाडेकराराची प्रत आवश्यक असते. त्यासाठी भाडेकरारांच्या सूची क्रमांक दोन आणि दस्तांची प्रमाणित प्रत दुय्यम निबंधकांनी उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.”
Comments are closed