सेंटर ऑफ एक्सलंस इन मरिटाइम स्टडीजचे उद्घाटन.
मुंबई,दि.८( punetoday9news):- प्राचीन काळापासून भारताला मोठा सामुद्रिक वारसा लाभला आहे. देशाला ७५०० किमी लांबीचा तर महाराष्ट्राला ७२० किमी समुद्र किनारा लाभला आहे. समुद्र केवळ देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा नाही; तर तो व्यापार, वाणिज्य, मत्स्य उत्पादन, तेल व भूगर्भ वायूनिर्मिती या दृष्टीने सर्वांकरिता महत्वाचा आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने समुद्राच्या विविध पैलूंचा शास्त्रीय पद्धतीने सर्वंकष अभ्यास करावा तसेच समुद्र विज्ञानातील देशाच्या समृद्ध वारस्याचे देखील पुनरुज्जीवन करावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
मुंबई विद्यापीठाने नव्याने स्थापन केलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन मरीटाईम स्टडीज’चे उद्घाटन राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत सोमवारी (दि. ८) पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
उद्घाटन सोहळ्याला भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे संचालक डॉ. शेखर मांडे, कुलगुरू सुहास पेडणेकर, प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी तसेच केंद्राच्या प्रभारी संचालिका अनुराधा मुजूमदार उपस्थित होते.
सागरी अध्ययन केंद्राने समुद्राचा एकात्मिक अभ्यास करताना समुद्रावर उपजीविका असणाऱ्या कोळी बांधवाच्या समस्यांचा देखील विचार करावा तसेच येऊ घातलेल्या वादळांची योग्य पूर्वसूचना देण्याचे दृष्टीने हवामान खात्यासोबत सहकार्य प्रस्थापित करावे असे राज्यपालांनी सांगितले. काही वर्षांनी मुंबई विद्यापीठ स्थापनेची १७५ वर्ष पूर्ण करील. तोपर्यंत सागरी अध्ययन केंद्र जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
जगातील ९० टक्के व्यापार जलवाहतुकीच्या माध्यमातून समुद्रातून होत असतो. मुंबई विद्यापीठाच्या सागरी अध्ययन केंद्रामुळे जनसामान्यांमध्ये समुद्राच्या व्यापक उपयुक्ततेबाबत जनजागृती होईल, असे नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी सांगितले. सागरी अध्ययन केंद्राने समुद्राशी निगडीत विविध क्लिष्ट समस्यांचा अभ्यास करून देशाच्या विकास प्रक्रियेत योगदान द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्राला भारतीय नौदल पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सखल सागरी मिशनसाठी चालू अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद केली असल्यामुळे मुंबई विद्यापीठाचे सागरी अध्ययन केंद्र योग्य वेळी स्थापन होत असल्याचे डॉ. शेखर मांडे यांनी सांगितले. केंद्राला गोवा येथील नॅशनल सेंटर फॉर ओशनोग्राफी संपूर्ण सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले.
Comments are closed