पुणे, दि.१०( punetoday9news):- महसूल विभागाचे महाराजस्व अभियान हे महत्वाचे अभियान असून याअंतर्गत लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती
घेऊन जनतेच्या प्रलंबित साध्या/वारस/तक्रारी नोंदी निर्गत करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. फेरफार अदालतीत नोंद करण्यात आलेल्या जनतेच्या प्रलंबित तक्रारी निर्गत करुन ई-फेरफार सातबाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात केले.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी फेरफार अदालतीच्या राजगुरुनगर, खेड आणि मंचर येथील मंडळ अधिकारी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, सारंग कोडलकर, तहसीलदार वैशाली वाघमारे, रमा जोशी यांच्यासह संबंधित मंडळातील मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, फेरफार अदालतीत जनतेच्या नोंदीत प्रलंबित तक्रारी तातडीने सुनावणी घेऊन निर्गत करा. या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा तात्काळ उपलब्ध करुन द्या. कामाचा वेग वाढवून प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सूचना दिल्या.
शासनाची योजना यशस्वी होण्यासाठी नागरीकांचा सहभाग खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी फेरफार अदालतीत जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे. महसूल विभागाच्या समन्वयाने आपल्या गावातील इतर नागरिकांना याबाबत माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
Comments are closed