पुणे, दि. ११(punetoday9news):-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी गर्दी टाळून यंदाचा शिवजयंती उत्सव साधेपणाने परंतु उत्साहात साजरा करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सव- २०२१ साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर पंचायत समिती येथील जिजामाता सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले.
यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, नगराध्यक्ष श्याम पांडे, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपवनसंरक्षक जयरामे गौडा, उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी सारंग कोडलकर, तहसिलदार हनुमंत कोळेकर, केंद्रीय पुरातत्व विभागाचे संरक्षक सहायक बाबासाहेब जंगले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी तसेच विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवप्रेमी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, यापूर्वी आढावा बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या सूचना विचारात घेऊन राज्य शासनाकडे शिवजयंती साजरी करण्याबाबत
प्रस्ताव सादर केलेला आहे. राज्य शासनाकडून शिवजयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन करण्यात येईल. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. शिवजयंती साजरी करणे आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवजयंती साजरी करतांना सर्वांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले. विद्युत व्यवस्था, गडावर करण्यात येणारी रोषणाई, स्वच्छतागृहांची सुविधा, अग्निशमन दल, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, हेलीपॅडची व्यवस्था इत्यादी बाबत आढावा बैठकीत घेण्यात आला.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शिवभक्तांनी शिवज्योत गडावर घेऊन जावू नये. शिवनेरी गडावर मोठया प्रमाणावर गर्दी होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासनाकडून शिवजयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले.
आमदार अतुल बेनके यांनी गडावरील इमारत व कमानीवर विद्युत रोषणाई करण्याची सूचना करत सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन केले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व विभागाच्या प्रमुखांसोबत प्रत्यक्ष शिवनेरीवर जाऊन पाहणी करत विविध विकास कामांचा आढावा घेतला.

Comments are closed

error: Content is protected !!