• विनाशकाले विपरीत बुद्धी ; ज्याचे डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची तुम्ही का एवढी दखल घेत आहात ? – अजित पवार.
• जेजुरीत मात्र पवारांच्या आगमनाचीच चर्चा व शंका.
जेजुरी,दि.१२(punetoday9news):- गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पत्रकारपरिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधत त्यांनी केलेल्या उद्घाटनाची हवाच काढून टाकली .
ते म्हणाले, “गोपीचंद पडळकरांना विनाशकाले विपरीत बुद्धी सूचली आहे. ज्याचे डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची तुम्ही का एवढी दखल घेत आहात? उभे राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा आहे का? प्रमुख पक्षाचे तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतेय आणि तुम्ही अगदी पत्रकारपरिषदेत मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारत आहात. लोकांनीच त्यांना नाकारले आहे, तुम्ही फार महत्व द्यायचे कारण नाही.” अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पडळकरांबद्दल प्रतिक्रिया दिली.
पडळकर म्हणाले होते कि, अजित पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून आहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण होऊ नये अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती, म्हणून आपण छुप्या पद्धतीने या पुतळ्याचे अनावरण केले.
स्थानिक पातळीवर दिवसभरात पडळकरांच्या बातमीने धुमाकूळ घालत सोशल मिडिया वर व्हायरल होणाऱ्या बातम्यांत अव्वल क्रमांक मिळवला.
तर याच खालोखाल जेजुरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पडळकरांचा निषेध व्यक्त करण्यात आल्याची बातमीही जेजुरी परिसरात चर्चेची ठरली आहे .
आता या नाट्यावर उद्घाटनाच्या वेळी पवार काय बोलणार ? याची उत्सुकता नागरिकांत निर्माण झाली आहे तर दुसरीकडे शरद पवार या नाट्यानंतर पुतळ्याचे उद्घाटन करण्यास येणार की नाही असाही प्रश्न काही नागरिकांकडून दबक्या आवाजात बोलला जात आहे.
Comments are closed